नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार

0
32

नागपूर : वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोवर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही.आमचा पक्ष आहे, पक्षाचं भलं कुठे होतंय, त्यानुसार विचार केला जाईल, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला. यावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बच्चू कडू यांच्यासाठी विचार करू, असे म्हणत असतानाच महायुती सरकारवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांच्याकडे सुनावणीसाठी गेले आहे.१६ आमदार अपात्रप्रकरणी राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. १० जानेवारीच्या सुनावणीत १६ आमदार अपात्रच होतील, असा दावा विरोधकांनी केला असून मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा एकदा जोर आला आहे तसेच, मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे बच्चू कडूही म्हणाले आहेत.
याबाबत विजय वडेट्टीवारांना विचारले असता ते म्हणाले, “बच्चू कडू काय म्हणतात ते पुढच्या काळात ठरेल. ते चांगेल मंत्री होते परंतु तिकडे (शिंदे गटात) गेले. त्यामुळे तेही (मंत्रीपद)गेले अन्‌‍‍ हेही गेलं. त्यांची महाविकास आघाडीत येण्याची तयारी असेल तर आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करू आणि हायकमांडच्याही कानावर टाकू. बच्चू कडूंची तयारी असेल तर चर्चा करायला तयार आहेत. त्यांच्या पक्षाचं भलं कुठे आहे ते त्यांना कळलं असेल, विजय वडेट्टीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
तसेच, १० जानेवारीला मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, पुढच्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे, अशी आमची माहिती आहे. ते आता नवरदेव कोण आहेत, हे १० तारखेच्या निकालानंतर कळेल. त्यामुळे बच्चू कडूंना अंदाज आला असेल की, आता मंडपही बदलतोय आणि नवरदेवही बदलतोय. त्यामुळे काही खरं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावरून पायउतार झाल्यानंतर ती संधी अजित पवारांना मिळणार का? असं विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून अनेकजण तयार आहेत पण मला वाटतं की, नवीन नवरदेव तयार आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here