साईमत जळगाव प्रतिनिधी
ज्या देशांमध्ये पेटंट अधिक असते. त्या देशांचे सकल देशातंर्गत उत्पादन (जीडीपी) जास्त असते. त्यामुळे भारताचा प्रवास विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होण्यासाठी पेटंटवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विगो लायब्ररी फाउंडेशनचे संस्थापक निलेश पावसकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बौध्दिक संपदा अधिकार कक्ष, रसायनशास्त्र प्रशाळा आणि वेगो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी ”पेटंट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पावसकर बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डी. एच. मोरे, समन्वयक डॉ. विकास गिते, वीगोचे आनंद जाधव उपस्थित होते. या प्रसंगी विगो फाउंडेशन आणि विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. २२८ जण यात सहभागी होते.
श्री. पावसकर म्हणाले की, भारतीयांनी जुन्या काळापासून खुप शोध लावले आहेत. मात्र त्यावर हक्क सांगितला नाही. गेल्या वर्षी चीनने ४१ लाख पेटंट घेतले तर भारतातील पेटंटचे प्रमाण होते अवघे ७१ हजार ज्या देशाचे पेटंट अधिक असते. तो देश आर्थिकदृष्टया समृध्द असतो आणि त्याचा जीडीपी दर अधिक असतो. प्राध्यापक संशोधन पेपर लिखाणावर भर देतात मात्र पेटंटकडे त्या तुलनेत लक्ष देत नाहीत. पेटंटमुळे वैज्ञानिक समाज निर्माण होईल असे सांगून श्री पावसकर यांनी विगो लायब्ररी फौंडेशनच्या माध्यमातुन आम्ही पेटंटसाठी सर्वतोपरी सहकार्य करीत असतो. त्याची माहिती दिली. राष्ट्रनिर्मितीत पेटंट हा घटक महत्वाचा आहे. भारताला संशोधनात जागतिक ओळख निर्माण करून द्यायची असेल तर पेटंटकडे अधिक लक्ष द्यावे लागेल असे ते म्हणाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी अध्यक्षीय भाषणात देशाच्या उच्च आर्थिक विकासासाठी बौध्दिक संपदा वाढवावी लागेल असे मत व्यक्त केले. सांस्कृतिकदृष्टया भारत अग्रेसर असला तरी डेटा ठेवण्यात आपण खुप मागे आहोत. पेटंटसाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते. नाविण्यपुर्व संशोधन वाढीला लागावे यासाठी कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना आहे. तसेच बौध्दिक संपदा कक्ष देखील आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि गुणवत्तापुर्ण पेटंट निर्माण करावे अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अब्दुल अहमद यांनी केले. तर आभार डॉ. अमरदीप पाटील यांनी मानले.