नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी सव्वा बारा वाजेला नाशिक येथे आगमन होईल. येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करतील. या मार्गाने प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी ४.१५ च्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.
सुलभ गतिशीलतेला चालना देण्यासाठी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. हा अटल सेतू, एकूण १७८४० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे २१.८ किमी लांबीचा सहा पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे १६.५ किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे ५.५ किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे.तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे.
२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव
देशाच्या विकासाच्या प्रवासात युवावर्गाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान सतत प्रयत्नशील असतात. या प्रयत्नातील आणखी एक पाऊल म्हणून, पंतप्रधान नाशिकमधील सत्तावीसाव्या(२७ व्या) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन करतील. दरवर्षी १२ ते १६ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो.१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आहे. यंदाच्या महोत्सवाचे यजमानपद महाराष्ट्र भूषवित आहे. भारतातील विविध प्रदेशातील तरुण त्यांचे अनुभव सामायिक करू शकतील आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेने एकसंघ राष्ट्राचा पाया मजबूत करू शकतील, या भूमिकेतून राष्ट्रीय युवा महोत्सव हा मंच तयार करण्यात आला आहे. नाशिक येथील महोत्सवात देशभरातून सुमारे ७५०० युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, देशी खेळ, आणि विविध विषयांवर आधारित सादरीकरण, युवा कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग, कथा लेखन, युवा संमेलन, खाद्य महोत्सव इत्यादींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येणार आहे.
नवी मुंबई येथे सार्वजनिक कार्यक्रम
नवी मुंबई येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान १२,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. सूर्या या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.१९७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून सुमारे १४ लाख लोकसंख्येला यामुळे पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सुमारे २००० कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. याशिवाय इतर रेल्वे प्रकल्प जे राष्ट्राला समर्पित केले जाणार आहेत, त्यामध्ये ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक ‘दिघा गाव’ तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करतील. या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासासाठी सक्षम करणे हा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि परिपूर्णता यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.