जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांची दुर्दशा ही मुख्य समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारकडून पुरेसा निधी आणला व तो प्रश्न मार्गी लावला आहे.पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला गती प्राप्त होईल,अशी ग्वाही आ.राजूमामा भोळे यांनी दिली असून,महानगरपालिका कर्जमुक्ती करणे व व्यापाऱ्यांशी निगडीत गाळे प्रश्नाची सोडवणूक ही आपली मुख्य कामे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जनतेचा आर्शिवाद माझ्या पाठीशी असून त्या जोरावर मी विजयाची हॅटीक साधणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दैनिक साईमतच्या एमआयडीसी परिसरातील मुख्य कार्यालयात श्री गणेशाची आरती करण्यासाठी काल सायंकाळी आ.राजूमामा भोळे हे आले असतांना ‘साईमत’ शी बोलतांना त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे व साईमतचे व्यवस्थापकीय संचालक परेश बऱ्हाटे यांची उपस्थिती होती.
आमदारांनी मुख्य कामे काय केली,असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे,त्याचे काय,असे विचारता आ. राजूमामा म्हणाले की,हा प्रश्न एकच व्यक्ती विचारत आहे.तरीही मी स्पष्ट करतो की,जळगाव मनपावर कर्जाचा बोजा असल्याने पालिकेची पत समाजात संपली होती. त्यामुळे मनपा कर्जमुक्त करणे महत्वाचे होते.शासन दरबारी पाठपुरावा करुन मनपाला कर्जमुक्त केले.
दुसरे महत्वाचे काम म्हणजे शहरातील गाळ्यांचा गंभीर प्रश्न मार्गी लावला. व्यापाऱ्यांशी निगडीत या प्रश्नामुळे व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.एवढी रक्कम भरणे अशक्यप्राय होते.शहरातील फुले मार्केट सोडले तर उर्वरित मार्केटची स्थिती सर्वांना ज्ञात आहे.हा केवळ जळगावचा नाही तर राज्यातील अनेक प्रमुख शहरांशी निग़डीत आहे.या प्रश्नी व्यापाऱ्यांंना जास्तीत जास्त दिलासा कसा देता येईल,याबाबतचा अंतिम तीन टप्प्यातील आराखडा तयार असून येत्या महिन्याभरात त्याबाबत निर्णय होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी आणल्याचा दावा केला जात आहे.हा विषय जळगावकरांसाठी गमतीचा होऊ लागला आहे.नेमका जळगावसाठी किती निधी मिळाला,असा प्रश्न विचारला असता आ.राजूमामा भोळे यांनी ३०० कोटीचा निधी मंजूर झाल्याचा दावा केला.प्रारंभीच्या टप्प्यात मनपा कर्जमुक्तीसह ३८ कोटीची विकास कामे मार्गी लागली.त्यानंतर विद्यमान सरकारने १०० कोटी दिले असून त्यातून शहरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत.आता शहरातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण होतील. त्यासंदर्भातील कार्यादेश निघाले असून प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरु होतील,असे त्यांनी सांगितले. या संदर्भात शासनाचे जीआर निघाले असून त्याची खात्री माहिती अधिकारात कोणीही करु शकते, असे आव्हानही त्यांनी केले.
जनताजनार्दन माझ्या पाठिशी
आ.राजूमामांशी गप्पा सुरु असतांनाच त्यांना वारंवार फोन येत होते.नागरिक त्यांना समस्या सांगत होते व लगेच ते संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन त्या समस्या त्वरेने सोडवण्याचे नम्रपणे सांगत होते.आ.भोळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे.ते जनतेच्या सुख-दुःखात नेहमी धावून जात असतात.याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की,हल्लीच्या राजकारणाचा दर्जा खालावला आहे.विकास कामे करतांना,एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा सर्वांनी एकत्र आले पाहिजे.मी जी काही कामे केली आहेत,त्यामुळे जनताजनार्दन माझ्या पाठिशी आहे.त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पुन्हा संधी दिल्यास,विजयाची हॅट्ट्रीक करणार आणि मताधिक्यही वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.