पुणे : प्रतिनिधी
अ.भा.त्रिपदी परिवाराच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिक कार्यावर भर न देता त्यास विज्ञानाची जोड देऊन समाजात पर्यावरण जनजागृत्ती करण्यावरही भर दिला जात आहे.त्यादिशेने महाराष्ट्रासह गुजरात,कर्नाटक,मध्यप्रदेशातही प्रत्यक्ष उपक्रम राबविले जात असल्याचे प्रतिपादन प.पू.बाबा महाराज तराणेकर यांनी येथे केले.
येथील लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.या सोहळ्यात,पूज्य नाना महाराज तराणेकर प्रणित अ.भा.त्रिपदी परिवार यांचे अर्ध्वयु तसेच दत्त संप्रदाय व त्रिपदी परिवाराचे वर्धिष्णू करण्याच अलौकिक कार्य यशस्वीरित्या केल्याबद्दल बाबा महाराज तराणेकर यांचा कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट(पुणे)यांच्यावतीने विशेष सन्मानपत्र देऊन तसेच आचार्य पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला. पुण्याच्या वेद भुवनचे आचार्य मोरेश्वर शास्त्री घैसास यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
स्त्रीवर्गास यज्ञकार्याचा
अधिकार शास्त्रसंमत
स्त्रीवर्गास यज्ञकार्याचा अधिकार शास्त्रसंमत आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख डॉ बाबामहाराज तराणेकर ह्यांनी कै लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचेवतीने त्यांना देण्यात आलेल्या मानपत्र स्वीकारताना केले.दत्त साक्षात्कारी संत पू नानामहाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या त्रिपदी परिवाराने गेल्या २८ वर्षात केलेल्या कार्याचा उल्लेख करून भारतातील ३५० शाखांचेद्वारे अनेक धार्मिक,सामाजिक कार्यक्रम राबविल्याचे तराणेकरांनी सांगितले. आदिवासी भगिनींद्वारे यज्ञात सहभाग, गेली दहा वर्षे इंदोरला स्रीवर्गाने केलेला तर्पण विधी उपक्रम, १००८ भगिनींनी केलेला गणेश याग,अनेक ठिकाणी मंदिर, सभागृह उभारणी आणि नर्मदा परिक्रमा वासियांचेसाठी निवारा, प्रसाद सुविधा पुरविणे ही त्यातील प्रमुख कामे आहेत. सर्वांना सहभागी करून घेत केलेले गोवर्धन याग,धन्वंतरी याग हे आगळे उपक्रम होते असे तराणेकर म्हणाले.डॉ तराणेकर स्वतः भूवैज्ञानिक असल्याने पाणी,पर्यावरण ह्या क्षेत्रात आधुनिक विज्ञान सूत्रे विचारात घेऊन त्यास अध्यात्मिक संकल्पनेची जोड देत प्राप्त झालेले परिणाम लक्षणीय होते हा अनुभव त्यांनी कथन केला.
धार्मिकतेला आध्यात्माची जोड
यावेळी मनोगत व्यक्त करतांना तराणेकर यांनी,हा सन्मान माझा नसून त्रिपदी परिवारातील प्रत्येक साधकाचा असल्याचा उल्लेख करीत,धार्मिकतेला आध्यात्म्याची जोड देऊन समाजजागृतीचे कार्य त्रिपदी परिवारातर्फे केले जात असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बीजमाता राहीबाई पोपेरे,लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन,सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांनाही लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पराग काळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रारंभी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष युवराज गाढवे ह्यांनी प्रास्ताविक स्वागत केले.खासदार श्रीनिवास पाटील,मोरेश्वर घैसास गुरुजी,ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार,सुनील देवधर ह्यांनी ट्रस्टने मान्यवरांचा गौरव करून समाजातील आदर्श व्यक्तींचा परिचय सर्वांना करून देण्याचे मोठे काम लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टने केले आहे असे आपल्या मनोगतात सांगितले.यावेळी सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. समारंभास दत्त मंदिर ट्रस्टचे सुनील रुकारी, ॲड.शिवराज कदम,ॲड. रजनी उकरंडे,अक्षय हलवाई आदि सर्व विश्वस्तांसह पुणेकर नागरिक उपस्थित होते.