नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटपासून दूर आहे मात्र लवकरच शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या उत्कृष्ट परफॉर्मन्सची दखल केवळ चाहते नाही तर आता बीसीसीआय घेतली असून या खेळातील सर्वात मोठ्या पुरस्काराच्या यादीत मोहम्मद शमीचे नाव समाविष्ट झाले आहे.
मोहम्मद शमीला क्रीडा क्षेत्रातील दुसरा प्रतिष्ठित पुरस्कार अर्जुन पुरस्कार मिळू शकतो अशी माहिती सध्या समोर येत आहे. वृत्तानुसार, खुद्द बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला याची शिफारस केली आहे.
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीला फक्त ७ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला पहिल्या ३ सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले होते पण चौथ्या सामन्यात शमी प्लेईंग इलेव्हनमध्ये परतल्यावर त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. शमीने केवळ ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या.मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
शमीने या स्पर्धेत तीनवेळा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला. त्याची धोकादायक गोलंदाजी प्रत्येक संघाविरुद्ध पाहायला मिळाली. सध्या शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे पण आता तो बरा झाल्यानंतर मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.२६ डिसेंबरपासून हा कसोटी सामना सुरु होणार असून भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.