मुंबई ः प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी आपण हे पाहिले की,अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या धर्मासाठी चित्रपटसृष्टी सोडताना दिसत आहेत.धर्मासाठी ग्लॅमरचे क्षेत्र सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये बरखा मदान, झायरा वसीम, सोफिया वसीम, सना खान यांची नावे आहेत. हे कलाकार अभिनय क्षेत्र सोडून धर्माच्या मार्गावर पुढे आले आहेत. त्यात आता एका मराठमोळी अभिनेत्रीने धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडले आहे.ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारी अनघा भोसले आहे. अनघाने वयाच्या २३ व्या वर्षी कृष्णभक्त होत अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे.
अनघाने गेल्यावर्षी २४ मार्च २०२२ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने अभिनय क्षेत्र सोडत कृष्णभक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘हरे कृष्ण.. मी अनुपमा या मालिकेत दिसत नसल्याने तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली हे मला माहिती आहे. मला भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार.ज्यांना माहित नाही,त्यांना मी या पोस्टद्वारे कळवू इच्छिते,मी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि माझी साथ द्यावी,अशी माझी अपेक्षा आहे.मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.अध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे आपआपले कर्म करत राहाल आणि जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यापासून स्वत: दूर व्हाल हे मला माहित आहे’, असे तिने लिहिले आहे.



