मराठा आरक्षणाचा निर्णय एक महिन्यात मार्गी लावणार

0
12

जालना : वृतसंस्था

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर १७ व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे.
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले बेमुदत उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपले बेमुदत उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत.
न्यायालयात टिकणारं आरक्षण द्यायचं : शिंदे
मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमच्या सरकारच्या जबाबदारी असून, ती आम्ही पूर्ण करणार असल्याचे मुख्यंमत्री शिंदे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण देणं सरकारची इच्छा आहे. तसेच न्यायालयात टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. पण, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यंमत्री शिंदे म्हणाले.
आतपर्यंत नेमकं काय घडलं?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. दरम्यान चार दिवसांनी म्हणजेच २ सप्टेंबर रोजी जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस उपोषणास्थळी आले होते. मात्र, यावेळी मोठी गर्दी झाल्याने आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून काही उपोषण कर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून दोन्ही बाजूने रेटारेटी सुरू झाली आणि पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत ३७ पोलीस आणि काही गावकरी जखमी झाले होते.
सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनधरणी!
जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने तब्बल पाच वेळा अंतरवेली गावात भेट दिली. मंत्री गिरीश महाजन, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा आरक्षणाचा सरसकट जीआर निघेपर्यंत माघार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शेवटी मनोज जरांगे यांनी सरकारला आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ दिला आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आमरण उपोषण मागे घेतलं.
आता मी शिंदे साहेबांच्या मागे लागणार : जरांगे
दरम्यान, उपोषण सोडतांना जरांगे म्हणाले की, शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केले आहे. मी भारावून न जाता आरक्षणाच्या प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार. आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिंदे साहेब येणार म्हटले आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here