आंतरवाली सराटी : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा मार्ग व रुपरेषा जाहीर केली आहे त्यानुसार, ते २० तारखेला आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून निघणार असून, २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सरकारविरोधात शड्डू ठोकलेत. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना आपल्या मुंबई आंदोलनाचा संपूर्ण मार्ग व रुपरेषा जाहीर केली. ते म्हणाले की, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासाठी आम्ही २० जानेवारी रोजी सकाळी ९ वा. आंतरवाली सराटी येथून निघणार. मराठा समाजातील सर्वजण १०० टक्के मुंबईला येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क व आझाद मैदान ही दोन्ही मैदाने लागणार आहेत.
आंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर २० जानेवारी रोजी मराठा समाजाचा पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात होईल.त्यानंतर दुसऱ्या दिवशी (२१ जानेवारी) करंजी घाट, बारा बाभळी (नगर) येथे दुसरा मुक्काम होईल. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे २२ जानेवारी रोजी मराठ्यांचा तिसरा मुक्काम होईल. २३ जानेवारी रोजी पुण्याच्याच खराडी बायपास लगत चौथा व २४ जानेवारी रोजी लोणावळ्यात चौथा मुक्काम होईल. त्यानंतर २५ जानेवारी रोजी नवी मुंबईच्या वाशीत ६ वा मुक्काम होईल. अखेर २६ जानेवारी आमची दिंडी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन स्थळी पोहोचेल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
पुण्यात २ दिवसांचा मुक्काम
आमचा मुक्काम पुण्यात पोहोचल्यानंतर आंदोलनात जवळपास १ कोटी मराठा बांधव सहभागी होतील असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, पुण्यात मराठा बांधवांचा आकडा १ कोटीवर पोहोचेल. आम्ही तिथे २ दिवस थांबणार आहोत. आम्हाला पुणे पहायचे आहे. पुण्याहून सर्वप्रकारची वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होतील.