चाळीसगाव /धुळे/ जळगाव : प्रतिनिधी
ही संधी आहे, संधीचे सोने करा, त्यात तुमचा किंवा माझा फायदा नसून घराघरातील मराठ्यांचा फायदा आहे. मराठा आरक्षणासाठी एकजुटीने एक व्हा माझा जीव गेला तरी चालेल मराठा आरक्षणासाठी एक इंचही मागे हटणार नाही, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. रविवारी चाळीसगाव, धुळे व जळगावात आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते.
मनोज जरांगे-पाटील पुढे म्हणाले की, मी मराठ्यांच्या लेकरांसाठी जीवाची बाजी लावली आहे. आरक्षण घरी कोणी आणून देणार नाही. त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, म्हणून अनेकजण षडयंत्र करीत आहेत. आरक्षणामुळे मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडत आहेत. टोळ्यांच्या टोळ्या मराठ्यांच्या विरोधात आल्या तरी मराठे पुरून उरतील. मराठ्यांची पोरं संपली तर मराठ्यांची जात संपेल, असा विचार करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, कोणी, कितीही, काहीही केले तरी त्याची चिंता तुम्ही करू नका, मी खंबीर असल्याच्या ग्वाहीसह सरकारला इशाराही त्यांनी दिला.
जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याचाच अर्थ जवळपास साडेसात लाख लोक याचा लाभ घेवू शकतात, असे त्यांनी सांगितले. आम्ही आरक्षणाचे सगळे निष्कर्ष पार केले तरी आम्हाला अजून आरक्षण दिले नाही. मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार, कोणीही आडवा आला तरी त्याला घाबरू नका, असेही त्यांनी सांगितले.
मराठ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला मात्र, त्यांच्याकडून मराठ्यांचा विश्वासघात केला गेला याआगोदर मराठ्यांचे आंदोलन फुटले. आता तसे होणार नाही. कारण संपूर्ण अभ्यास आम्ही केला असून मगच आंदोलन सुरु केले आंदोलन यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. चाळीसगावात सभेचे सूत्रसंचालन भाग्यश्री तुपे, जयश्री रणदिवे यांनी केले तर आभार गणेश पवार यांनी मानले.