नागपूर : वृत्तसंस्था
देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इंडिया’ आघाडीबाबत एक भाकीत वर्तवले आहे. इंडिया आघाडीच्या बैठका केवळ नावापुरत्या आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर त्यांना विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्याही जागा मिळणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
‘इंडिया’ नावाच्या शब्दात डॉट लावणे योग्य नाही. आघाडीतील पक्षांमध्ये एकमत नाही. हा काही नवीन प्रयोग नाही, यापूर्वी असे प्रयोग झाले. ‘इंडिया’ बॉम्ब फुसका असून त्यातून बारुद कधीच निघालेली आहे, हा बॉम्ब निकामी आहे. अनके नेते दुरावले आहेत, चेहऱ्यावरील उत्साह गेला आहे. देशात आपण दिसलो पाहिजे म्हणून ते बैठका घेत आहेत. त्यांच्यामागे जनता नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
इंडिया आघाडीचा संयोजक कुणीही झाला तरी काही फरक पडणार नाही. हे त्या डबक्यात कुदतील आणि त्या डबक्यात राहतील. हे नेते देश स्तरावर काहीच करू शकणार नाहीत. देशाला उंची देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा किंचित सेना म्हणून उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या किंवा नाकारलेल्या निर्णयाच्या फाईल्स थेट आपल्याकडे न पाठवता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतच आपल्याकडे पाठवाव्यात, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांचे पंख छाटले, अशी चर्चा सुरू आहे. यावरही बावनकुळे यांनी भाष्य केले.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र निर्णय घेतात. तिन्ही नेत्यांना एकमेकांचे निर्णय माहीत असले पाहिजे, कळले पाहिजे. घेतलेले निर्णय अधिक प्रभावी असले पाहिजे. त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे बावनकुळे यांनी सांगितले. एखाद्या नेत्याने घेतलेल्या निर्णयात दुसरा नेता आणखी काही भर घालेल, यामुळे त्या निर्णयाची ताकदच वाढेल, असेही बावनकुळे म्हणाले.