राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठे फेरबदल
मुंबईः (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विश्वासात घेऊनच फेरबदल होत असल्याची माहिती मिळालेली आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाचे पद दिले जाईल, अशी शक्यता आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी आ. रोहित पाटील यांना संधी दिली जाऊ शकते रोहित पवार यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आठवडाभराच्या बैठकांनंतर संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादीही निश्चित झाली असून शरद पवारांच्या होकारानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार प्रभारीपदे वाटून दिली जाणार आहेत.
आठवड्याभरापासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे मुंबईत होत्या. तेव्हा या गुप्त बैठका झाल्या होत्या. कोअर टीम या बैठकीला उपस्थित होती. दोन महिन्यांपासून जयंत पाटील सातत्याने बोलत होते, की मला बदल हवाय. आठ वर्षांपासून मी जबाबदारी सांभाळतो आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी रोहित पवार गट अॅक्टिव्ह झाला होता. रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद हवे होते; पण तेव्हा जयंत पाटलांनी जाहीरपणे सुनावले होते. माझे दिवस मोजू नका मी पद देणार आहे’ शेवटी निवडणुका झाल्यानंतर भाकरी फिरवणे गरजेचे होते. नव्या नेतृत्वाला पुढे आणणे गरजेचे होते. त्यातूनच ही चर्चा सुरू झाली होती.
शरद पवार याच्यावर काय निर्णय घेतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आ. पवार या बदलासाठी आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. दहा तारखेला पक्षाचा वर्धापन दिन आहे, तोपर्यंत बदल करावेत, असा आग्रह नेत्यांकडून करण्यात येत आहे. यादी तयार असून शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच हे बदल होणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून कळाली.