महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
नवसारी (वृत्तसंस्था )-
गुजरातमधील नवसारी येथे महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. नीलमबेन पारिख यांनी महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल गांधी यांच्यातील मतभेदांवर पुस्तक लिहिले होते, ज्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.
नीलमबेन यांनी आपले आयुष्य समाजकार्याला वाहिले होते. त्यांनी आदिवासी महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले.
हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच अपत्ये होती. त्यापैकी रामीबेन यांची कन्या म्हणजे नीलमबेन. त्या खादीच्या प्रसारासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाबाबत माहिती देताना त्यांचे चिरंजीव डॉ. समीर पारिख यांनी सांगितले की, “माझ्या आईला कुठलाही मोठा आजार नव्हता. वयोमानानुसार तिने अन्नग्रहण कमी केले होते. तिला ऑस्टिओपोरोसिस होता, त्यामुळे तिची हाडे ठिसूळ झाली होती. कोणत्याही वेदनेशिवाय शांततेत गेली.”
नीलमबेन आणि त्यांचे पती योगेंदरभाई यांनी १९५५ मध्ये मुंबई सोडली आणि ग्रामीण भागात समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला सौराष्ट्र व ओडिशामधील गावांमध्ये राहून समाजकार्य केले. १९६२ मध्ये ते गुजरातमध्ये स्थायिक झाले, नीलमबेन यांनी तापी जिल्ह्यात शाळा सुरू केली



