जळगाव : प्रतिनिधी
गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू नये, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणे शक्य नाही, असे विधान महाजन यांनी केले होते.
मनोज जरांगे पाटील सध्या धुळे, जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावात रविवारी रात्री उशीरापर्यंत जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी जळगावात पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरुन सरकारसह मराठा समाजाच्या आमदारांना देखील निर्वाणीचा इशारा दिला.
महाजनांच्या आश्वासनांची अनेक पुरावे
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, गिरीश महाजन यांनी विचार करुन वक्तव्ये करावीत. त्यांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर त्यांना आपण वेळ दिला होता. आमच्याकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे अनेक पुरावे आहेत. तसेच, त्यांनी चुकीची वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करू नये. अन्यथा आम्ही त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. संकटमोचक असलेल्या मोठ्या मंत्र्याने असे बोलणे योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील पदाधिकाऱ्यांची
१७ डिसेंबरला बैठक
याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील आणि खानदेशातील मराठे एकत्र येत नाही, असे म्हटले जायचे पण सभेची गर्दी पाहून तुमच्या लक्षात येईल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच, १७ डिसेंबरला आम्ही बैठक घेणार आहे. राज्यभरातून सर्व मराठा अंतरवाली सराटी येथे येणार आहेत. राज्यातील आंदोलक, डॉक्टर व व्यावसायिक मराठा बांधव देखील या बैठकीला येणार आहेत. या बैठकीत २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजातील सर्व आमदारांनी दबाव टाकून आरक्षणाचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडावे, त्यांचे उपकार समाजबांधव विसरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
तर सरकारला महाग पडेल
सरकारला अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा अशी विनंती करणार आहे. अधिवेशनातच आरक्षणाचा कायदा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे अजूनही मराठा आंदोलक बांधवांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. गुन्हे दाखल करून लोकांना अटक करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालवे. गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.