अलिबाग : वृत्तसंस्था
परिस्थिती बघून राजकीय युती करावी लागते, यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही. हातावर हात ठेऊन विरोध करणे हा आपला अजेंडा नाही. त्यामुळे सत्तेत बसून लोकांची कामे कशी मार्गी लागतील हे महत्वाचे आहे. आम्ही युती केली असली तरी पक्षाचा विचार सोडलेला नाही. विरोधी पक्षाचे लोक रोज वल्गना करतात पण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांंधिल नाही.आमची बांधिलकी लोकांशी आहे,ती आम्ही ठेऊ अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे मांडली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार सभेत बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, सुधाकर घारे, दत्ताजीराव मसूरकर उपस्थित होते. सध्या महाराष्ट्राचे वातावरण वेगळ्या पध्दतीचे आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार, पण इतरांच्या भावना दुखावणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही. जातीत वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण हवे आहे.
ओबिसी समाजालाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे वाटते आहे. पण इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता, या समाजांना आरक्षण द्यायला हवे यावर सर्वांचे एकमत आहे. तशी पाऊले सरकार टाकत असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.