वकील महिलेला ७५ लाखांत गंडवले , तिघांना अटक
जळगाव ( प्रतिनिधी ) –
जळगावात संगनमताने कट रचून भूमिरत्नम रियल इस्टेट प्रा. लि. नावाची शेल कंपनी तयार करून ६५ वर्षीय महिला वकिलाची ७५ लाखांत फसवणूक केल्याच्या शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात मनीष जैनसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिघांना अटक करून कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अॅड. शिरीन अमरेलीवाला (वय ६५, रा. शांतीबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार मनीष जैन (वय ४९, रा. यश प्लाझा), अतुल जैन (वय ५०), यशोमती जैन, जाफर खान (रा. सुप्रीम कॉलनी), विजय ललवाणी (रा. सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा. गोलाणी) व केतन काबरा (रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जयनगर) यांच्या विरुद्ध शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. या सात जणांनी संगनमत करून बनावट शेल कंपनीत ७५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्या बदल्यात व्याज देण्याचे व मुंबईत फ्लॅट देण्याचे सांगितले होते. सुरुवातीला नफ्याची रक्कम दिली. मात्र, त्यानंतर पैसे दिले नाहीत. आर्थिक गुन्हा शाखेतर्फे तपास केल्यानंतर अमरेलीवाला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ मे रोजी रात्री मनीष जैन, अतुल जैन व विजय ललवाणी या तिघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना कोटनि सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.