राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम
जळगाव (प्रतिनिधी)-
महसूल विभागाने राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. या मोहिमेचा उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतातजिल्ह्यातील ज्यांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी तलाठ्याकडे जाऊन नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
१ ते ५ एप्रिल : तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करतील. ६ ते २० एप्रिल: वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. तलाठी पडताळणी करून वारस ठराव मंजूर करतील. २१ एप्रिल ते १० मे: तलाठी वारस फेरफार तयार करतील आणि मंडळ अधिकारी ७/१२ दुरुस्त करतील.
मयत खातेदारांच्या याद्या तलाठी यांचेमार्फत तयार करण्यात येत आहेत. मयत खातेदार यांचे वारसांनी मृत्यू प्रमाणपत्र व वारसांची माहिती तलाठी यांचेकडे द्यावी. तहसीलदारांना समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्याना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सर्व वारस नोंदी घेऊन ७/१२ “जिवंत” म्हणजेच अद्ययावत करणेसाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे