जे.एस. देवरे यांना ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्कार
अमळनेर ( प्रतिनिधी)-
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांना अतुलनीय कामगिरीबद्दल ‘इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड’ संस्थेच्या ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुंबईतील पवई येथील हिरानंदानी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड संस्थेने २०२४-२५ या वर्षासाठी हा पुरस्कार दिला आहे. जे.एस. देवरे यांची २८ वर्षांची शैक्षणिक कारकीर्द आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी यांचा विचार करून त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.
हा पुरस्कार भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी डॉ. किरण बेदी आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारासोबतच जे.एस. देवरे यांना तीन हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. या पुरस्कारामुळे अमळनेर शहराचा गौरव वाढला आहे. पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, शिक्षक आणि कर्मचारी यांनी जे.एस. देवरे यांचे अभिनंदन केले आहे.