मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे अशक्य

0
38

मलकापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले आहे पण, सरकारनं दिलेल्या आश्वासानंतर जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे तर, या वक्तव्यानंतर जरांगे-पाटील यांनी महाजनांना सूचक इशारा दिला आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?
“सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे.मी जरांगे-पाटील यांची चारवेळा भेट घेतली, तेव्हाही सांगितलंय की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. कुणबी दाखले सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. पण, मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार? हा प्रश्न आहे. न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनीही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे,” असे गिरीश महाजनांनी म्हटले आहे.
यावर जरांगे-पाटलांनी म्हटले, “गिरीश महाजन यांनी विचार करावा कारण, मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी आम्ही गिरीश महाजनांना ४ दिवसांचा वेळ दिला होता पण, ‘हा वेळ पुरेसा नसून १ महिन्यांची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो,’ असे महाजनांनी सांगितले.आता महाजनांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचे काम करू नये.”
मायबाप बांधवांना विनंती आहे. ज्यांना आरक्षण मिळालं आहे आणि ज्यांना मिळालं नाही असे सगळे जण एकत्र या. गोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्याची हीच वेळ आहे. सगळ्यांनी एकत्र या. माझा जीवही गेला तरीही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. असंही जरांगे पाटील म्हणाले.

महाजनांनी फडणवीसांचे नाव खराब करू नये
“गिरीश महाजनांच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. माध्यमांचे व्हिडीओही आहेत. पूर्ण राज्यात ते व्हायरल करू. ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांनी भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये.आमचा महाजनांवर विश्वास असल्याने तीनवेळा व्यासपीठावर मानसन्मान दिला आहे. आता, महाजनांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव खराब करू नये,” असेही जरांगे-पाटलांनी खडसावले.
…तर गाठ आमच्याशी आहे

मंत्री गिरीश महाजनांना इशारा
“मी तुमच्याशी खरं बोलतो आहे. आमदार झाल्यावर काही लोक जात पाहू लागले आहेत. आम्ही जात पाहिली नाही. तरीही काहीजण आपला अपप्रचार केला जातो आहे. आम्हाला सांगण्यात आले होते की, कुणाला अटक होणार नाही आणि गुन्हे मागे घेतले जातील. गिरीश महाजन यांना माझा सवाल आहे की,अजून गुन्हे मागे का घेतले नाही? आमचे लोक का अटक केले? शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here