दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?

0
13

नागपूर ः वृत्तसंस्था

मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १७ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का, असा प्रश्न आहे.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन करणारे हे पहिले सरकार आहे.सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. सरासरी प्रत्येक जिल्ह्यात मागच्या ऑगस्टमध्ये शंभर – सव्वाशे आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी त्रस्त आहे. ९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असातना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज का पडली, हा खरा प्रश्न आहे.”
“कॅबिनेटच्या नावाखाली मौजमस्ती करायला तर हे सरकार येत नाहीये ना असा विषय चर्चेला आला आहे. यापूर्वी कॅबिनेटच्या बैठका झाल्या, पण मंत्री कधीही फाईव्ह स्टारमध्ये थांबले नव्हते. फाईव्ह स्टारचा पाहुणचार घेतला नव्हता. विश्वासराव देशमुख, अशोक चव्हाण किंवा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या तेव्हा गेस्ट हाऊसमध्ये थांबून बैठका घेतल्या. हाजोर थाळ्यांची जेवणाची प्लेट, पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. सरकाराल जनाची नाही पण मनाची लाज वाटत असेल तर जरा तरी विचार करावा. फडणवीस सरकारने २०१६ ला दिलेलं पॅकेज मराठावाड्यातील जनता विसरली नाही. ५० हजार कोटीच्या पॅकेजचं काय झालं? मराठवाड्यातील जनता अशा नालायक सरकारला माफ करणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.
“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?”, असेही ते म्हणाले.
मंत्र्यांच्या खर्चाची यादीच केली जाहीर
फाईव स्टार हॉटेल ३० रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री) ताज हॉटेल ४० रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल ७० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता ॲम्बेसेडर ४० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी १०० रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन १०० (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे २० ( इतर अधिकारी) एकूण १५० गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.औरंगाबाद शहरातील देखील १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here