गुलाबराव देवकरांच्या शिक्षण संस्थेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची चौकशी
जळगाव (प्रतिनिधी)-
३ मे रोजी मुंबई येथे जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशानंतरच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांतच गुलाबराव देवकर यांच्या शिक्षण संस्थेने घेतलेल्या कर्जाची चौकशी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
श्रीकृष्ण शिक्षण संस्थेने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या १० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ही चौकशी आहे. या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आहेत.
हे कर्ज बेकायदेशीर घेतल्याचा आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यांनी देवकर यांच्यावर अनेक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत,घोटाळे झाकण्यासाठीच त्यांनी पक्षांतर केले, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज सहकार विभागाचे पथक जळगाव जिल्हा बँकेत दाखल झाले. शिरपूर येथील सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक चौकशीसाठी आले असून धुळे जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी चौकशी पथकास सहकार्य केले जात असून मागितलेली सर्व कागदपत्रे प्रदान केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय गोटात या घडामोडींची र चर्चा असून, गुलाबराव देवकर यांच्यावर दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.