भारताच्या लेकींचा ऑस्ट्रेलियावर कसोटी मालिकेत पहिलाच शानदार विजय

0
53

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला.या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा आणि दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४०६ धावा आणि दुसऱ्या डावात २ गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली.
या अटीतटीच्या कसोटीत भारतीय संघाचा दबदबा कायमच राहिला. पहिल्या डावात २१९ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. यादरम्यान ताहिल मेग्रॅथने अर्धशतक झळकावले. तिने ५६ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या. मुनीने ४० धावांची खेळी खेळली. दुसऱ्या डावात २६१ धावा करून संघ सर्वबाद झाला. ताहिलाने दुसऱ्या डावात १७७ चेंडूंचा सामना करत ७३ धावा केल्या.या दरम्यान १० चौकार मारले. संघासाठी एलिस पेरीने ४५ धावांचे योगदान दिले.
भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या. तिने १६ षटकात ५३ धावा दिल्या तर स्नेह राणाने २२.४ षटकात ५६ धावा देत ३ विकेट घेतल्या. दीप्ती शर्माने २ विकेट घेतली. स्नेहने दुसऱ्या डावात ४ विकेट घेत २२ षटकात ६३ धावा दिल्या.राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली.
टीम इंडियाने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ४०६ धावा केल्या होत्या. सलामीवीर मानधनाने १०६ चेंडूंचा सामना करत ७४ धावा केल्या. तिने १२ चौकार मारले. शफाली वर्माने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रिचा घोषने १०४ चेंडूंचा सामना करत ५२ धावा केल्या. तिने ७ चौकार लगावले. जेमिमाह रॉड्रिग्जने ७३ धावांची शानदार खेळी केली. दीप्ती शर्माने ७८ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने ४७ धावा केल्या.
भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत विजयासाठी अवघ्या ७५ धावांचे लक्ष्य दिले गेले. टीम इंडियासाठी मंधानाने दुसऱ्या डावात नाबाद ३८ धावा केल्या. तिने ६१ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार लगावत शानदार कामगिरी केली. रिचा १३ धावा करून बाद झाली. जेमिमाने नाबाद १२ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने मुंबई कसोटी ८ गडी राखून जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here