सेंच्युरियन : वृत्तसंस्था
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभवासह भारताला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे, हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का होता, पण आता भारतासमोर आता अजून एक अडचण आली आहे. आयसीसीने भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. भारत आता पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे.
सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने सर्व खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आणि दोन महत्त्वाचे गुणही कमी केले. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे.आयसीसीने टीम इंडियाला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत दंड ठोठावला आहे. हे कलम किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. भारताने २ षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि २ गुण कापण्यात आले.
ऑस्ट्रेलियाला फायदा
सेंच्युरियन कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे १६ गुण होते आणि गुणांची टक्केवारी ४४.४४ होती परंतु आयसीसीने २ गुणांचा दंड ठोठावला, त्यानंतर भारताचे १४ गुण आणि गुणांची टक्केवारी ३८.८९ वर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षाही खाली गेला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या क्रमांकावर होता, मात्र आता तो पाचव्या स्थानावर पोहोचला असून भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.