नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकले आहे. स्कॉशमध्ये भारताच्या पुरुषांच्या संंघाने पाकिस्तानचा पराभव करत सुवर्ण जिंकले. भारतीय संघाने अतिशय चुरशीच्या लढतीत पाकिस्तान २-१ असा पराभव केला.स्कॉशमधील या सुवर्णपदकासह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १० झाली आहे तर १३ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण पदकांची संख्या ३६ झाली आहे.
स्कॉशमधील अखेरच्या सामन्यात भारताच्या अभय सिंहने पाकिस्तानच्या जमान नूरचा ११-७, ९-११, ७-११, ११-९ आणि १२-१० असा पराभव केला आणि देशाला सुवर्ण जिंकून दिले. पुरुष संघातील पहिल्या सामन्यात सौरव घोषालने मोहम्मद आसिम खानचा पराभव केला होता तर महेश मंगाओंकरचा पाकिस्तानच्या नासिर इकबालकडून पराभव झाला. अखेरच्या निर्णायक लढतीत अभय सिंगने देशाचे नाव उंचावले.
भारताच्या या सुवर्णपदकाचा हिरो ठरला तो चेन्नईचा अभय सिंग,ज्याने निर्णायक लढतीत संयम दाखवला आणि नूरचा पराभव करत विजय मिळवला. विजयानंतर अभयने रॅकेट हवेत फेकले आणि जल्लोष केला. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून फक्त सुवर्णपदक जिंकेल नाही तर साखळी फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा देखील बदला घेतला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २०१४ साली सुवर्णपदक जिंकले होते तर पाकिस्तानने २०१० साली सुवर्ण जिंकले होते.
