इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या खराब फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला किमान तीनशेपार मजल मारता आली. इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवणार होती, पण इंग्लंडच्या कर्णधाराने तो पर्याय नाकारत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
५७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने ७३ तर पंतने ९१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही एकाकी झुंज देत नाबाद ८५ धावा केल्या. या डावात भारताचे दहाच्या दहा खेळाडू झेलबाद झाले. घरच्या मैदानावर एकाच डावात सगळे भारतीय फलंदाज झेलबाद होण्याची नामुष्की टीम इंडियावर तब्बल २० वर्षांनी ओढवली. या आधी मुंबईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय फलंदाजांबाबत हा प्रकार घडला होता.
दरम्यान, त्याआधी इंग्लंडचा डाव सर्वबाद ५७८ वर आटोपला. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक हे डावातील विशेष आकर्षण ठरले. त्याला आधी डॉम सिबली आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळींची साथ मिळाली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी थोडीफार फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. बुमराह-अश्विनने ३-३ तर इशांत शर्मा-नदीमने २-२ बळी टिपले.