अधिवेशनात आज अवकाळीवर चर्चा, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

0
57

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशनावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज सोमवार ११ डिसेंबर रोजी विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांच्या मुद्द्यामुळे हिवाळी अधिवेशाचे पहिले दोन दिवस अत्यंत गाजले. परंतु आता अधिवशेनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासानंतर अवकाळीच्या मुद्द्यावर ही अल्पकालीन चर्चा होईल. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरेल.
राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाच्या वर्षात एकामागून एक संकट येतच गेली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले त्यानंतर दुष्काळ, पुन्हा गारपीटीसह आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच पार्श्वभूमीवर ७५ टयांपेक्षा अधिक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरीही अनेक भागात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत १ हजार २२८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही अनेक तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही, असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान अशा अनेक मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

राज्यात अवकाळी
पावसाची हजेरी
जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात दिलासा देणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावासने अक्षरश: झोडपून काढलं. यामुळे कापूस, भात यांसारख्या अनेक पिकांना फटका बसला. त्यातच विमा कंपनींकडून देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here