चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आडगाव गावातून कत्तलीच्या उद्देशाने ३ बैल पायी हाकत नेत असताना गोरक्षकांनी त्यांना थांबवत शहर पोलिसांना कळविल्यावर त्याठिकाणी जाऊन शहर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. केलेल्या कारवाईचा राग आल्याने शेकडोंचा जमाव रात्री शहर पोलीस स्टेशनला धावून आला. पोलिसांनी कारवाई करु नये, याकरीता अवैध गर्दी गोळा करुन दबाव निर्माण करणे, धमक्या देणे हा प्रकार पोलीस स्टेशनच्या खालील चौकात सुरु होता. त्याठिकाणी सुद्धा जमाव पोलिसांचे काहीच ऐकुन न घेता उलट गोंधळ घालीत होता. त्यामुळे शेवटी पोलीसी खाक्या दाखवत जमावाला पळवून लावले. दरम्यान, अवैध गोतस्कारांची मुजोरी वाढली असून चक्क खाकी वर्दीवर हात उचलला आहे. त्यातच सपोनि अजित सावळे यांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
यावल नाक्याजवळील सानेगुरुजी वसाहत परिसराजवळ शेकडोचा जमाव जमा होत आहे, अशी सूचना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे व हवालदार संतोष पारधी हे दोघे दुचाकीने ताबडतोब त्याठिकाणी पोहोचले. जमावास हटकले असता उलट त्यांनीच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे व हवालदार संतोष पारधी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धक्काबुकी करत कॉलर पकडून लोखंडी फायटरने व काठीने मारहाण केली. त्याची सूचना शहर पोलीस स्टेशनला कळताच स्वतः पोलीस निरीक्षक व इतर सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला. सर्व घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. थेट वर्दीवरच हात टाकल्यामुळे गो-तस्कराची मुजोरी किती वाढली आहे, हे यावरुन दिसून येत आहे.
घटनेतील सर्व आरोपींवर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुरनं. ६०९/२०२३ नुसार भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६, ४२७, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शेख साजीद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी, शेख इब्राहीम शेख हमीद कुरेशी, शेख नाजीम शेख युनुस, शोऐब सलीम कुरेशी, रईस रज्जाक कुरेशी (सर्व रा.सानेगुरुजी वसाहत, चोपडा) व इतर १० ते १५ लोक आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.
पोलीस हे समाजात रक्षकाच्या भुमिकेत असतात. त्यांच्यावरच जर का अशाप्रकारे जीवघेणा हल्ला होत असेल तर ही मुजोरी, गुंडगिरी जागेवरच ठेचून काढायला हवी, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते व तसे झाल्यास सर्वसामान्यांचे हाल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.