काहीजण स्वत:चा हट्ट सोडायला तयार नसतील तर आम्ही तरी किती काळ थांबायचं?-अजित पवार

0
14

मुंबई ः प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात थेट भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्षफुटीनंतर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत विधान केले होते. त्यांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे, असेही अजित पवार म्हणाले होते. यानंतर आता सत्तेत सामील होण्याआधी शरद पवारांनी काय सल्ला दिला होता? यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे.
पक्षफुटीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “पाठिमागच्या काळात देशात अनेक वेळा अनेक गोष्टी घडल्या आहे. काँग्रेसमध्येही फूट पडली होती. बऱ्याच ठिकाणी बरंच काही घडलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की, आता असं काही घडू नये, आता काहींनी (शरद पवार) आशीर्वाद देण्याचे काम करावे. आम्ही तर आवाहन केले आहे की, आम्ही कुठे चुकलो तर वडिलकीच्या नात्याने त्यांनी सल्ला द्यावा. आम्ही असे म्हणत नाही की,आम्ही काम करतो म्हणजे आम्ही सर्वगुणसंपन्न आहोत. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा गाडा हाकत असताना काही चुकीचे घडतेय, असे कुठल्या वडिलधाऱ्यांना वाटले तर त्यांनी सांगावे. आम्ही लगेच चूक दुरुस्त करू. आम्हालाही राज्याचे आणि जनतेचे हित साधायचे आहे. एका नव्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी बोललात, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सल्ला दिला? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, “सगळ्यांशी जे बोलायचं होतं, ते बोललो आहे. पण काहीजण स्वत:चा हट्ट सोडायला तयार नसतील तर शेवटी आम्ही तरी किती काळ थांबायचं? काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नसते. प्रत्येकाला ती महत्त्वाची वाटत असते. आम्हीही 30-35 वर्षे राजकारणात काम केले आहे. त्यामुळे आम्हालाही खूप काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत. आमची तशी इच्छा आणि आवड आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here