लहानपणापासूनच पूजा करतो – शरद पवार
ठाणे (प्रतिनिधी)-
माझ्याबाबतीत अर्धसत्य सांगितले जाते पण, मी लहानपणापासूनच पूजा करतो. मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा पांडुरंगाची पूजा केली आणि त्याचबरोबर तुळजापूरला जाऊनही पूजा करतो, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाण्यात पत्रकारांशी दिले.
ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
मी अशा कार्यक्रमांना जात नाही, असे अर्धसत्य सांगितले जाते. परंतु मी लहानपणापासूनच देवाची पूजा करतो. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी मी पांडुरंगाची पूजा करण्यासाठी पंढरपूरला चार वेळा गेला आहे. तुळजापूरला जाऊनही मी पूजा करतो. त्यामुळे मी अशा कार्यक्रमांना जात नाही हे जे सांगितलं जातं ते अर्धसत्य आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.
देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे भवानी मंदीर ओळखले जाते या शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारण्यात आले आहे. या पूजेनंतर हे मंदिर राज्यातील सर्वांसाठी खुले करण्यात येत असल्याची घोषणा पवार यांनी केली.
दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, २६ स्तंभ, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर साकारले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभे केले आहे, अशी माहिती वास्तुविशारद संजय बोबडे यांनी दिली.