दुबई : वृत्तसंस्था
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी २०२४ मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. गेल्या आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स या संघाने करनला १८.५० कोटी रुपये देत आपल्या संघात सहभागी केले होते. पण या आयपीएलमध्ये मात्र सर्वाधिक पैसे मोजले ते सनरायर्स हैदराबादच्या संघाने.हैदराबादच्या संघाने यावेळी तब्बल १० पट जास्त किंमत मोजली आणि मॅचविनर खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले.
ऑस्ट्रेलियाने यावर्षी वनडे वर्ल्ड कप जिंकला.यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला होता तो कर्णधार पॅट कमिन्सने.त्यामुळे कमिन्सचे नाव जेव्हा लिलावात घेतले तेव्हा त्याच्यावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावायला सुरुवात केली. चेन्नई आणि मुंबई यांच्यात यावेळी चांगलीच चुरस रंगली होती पण काही वेळात मुंबईच्या संघाने माघार घेतली आणि त्यामुळे चेन्नईचा संघ आता कमिन्सला आपल्या संघात स्थान देणार, असे वाटत होते पण त्यावेळी हैदराबादच्या काव्या मारनने यावेळी लिलावात एंट्री घेतली. त्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद यांच्यामध्ये बोली सुरु झाली. काही वेळात चेन्नईच्या संघानेही माघार घेतली.
त्यामुळे आता कमिन्स हैदराबादच्या संघात जाईल, असे वाटत होते. पण त्यावेळी लिलावात एंट्री झाली ती आरसीबीच्या संघाची. त्यानंतर आरसीबी आणि हैदराबाद यांच्यामध्ये चांगलीच शर्यत रंगल्याचे पाहायला मिळाले. कारण हैदराबाद आणि आरसीबी या दोन्ही संघांनी कमिन्ससाठी मोठ्या बोली लावायला सुरुवात केली. त्यावेळी कोणताही संघ मागे हटण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे तब्बल १० पट रक्कम कमिन्सला मिळाली. हैदराबादने अखेर २० कोटी ५० लाख रुपयांची बोली कमिन्सवर लावली. त्यानंतर आरसीबीने माघार घेतली आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हैदराबादच्या संघाने घेतला.हैदराबादच्या संघाने यावेळी आयपीएलच्या एतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतला आहे. त्यामुळे आता कमिन्स कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.