जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक असलेले एकूण ७४ मुख्याध्यापकांचा सन्मान राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त शहरातील सद्गुरू शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके, माजी महापौर सीमाताई भोळे, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, खो-खोचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, ग.स.सोसायटीचे संचालक अजय देशमुख, ग.स.सोसायटीच्या विद्या प्रबोधिनीचे चेअरमन मंगेश भोईटे,जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ विजय पाटील, महाराष्ट्र इंडीयाका स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.हाजी इकबाल मिर्झा, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांंत कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले. स्वागतगीत व महाराष्ट्र गीत पंकज पाटील, प्रा.प्रशांत सोनवणे, प्रा.समीर घोडेस्वार यांनी सादर केले जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.आमदार राजुमामा भोळे यांंच्यातर्फे प्रत्येक सन्मानार्थी मुख्याध्यापक यांना क्रीडाशिक्षक यांंचे महत्व या संदेशाचे सन्मानपत्ररुपी सूंदरसा लखोटा भेट देण्यात आला तसेच मुख्याध्यापक नासिर खान यांचेकडून प्रत्येकास साने गुरुजी यांचे पुस्तक भेट देण्यात आले. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी व मुख्याध्यापक एल.एस.तायडे यांनी मनोगतातून राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्व, मेजर ध्यानचंद यांची क्रीडा कारकीर्द व जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ राबवित असलेले विविधांगी नाविन्यपूर्वक उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी चोपडा येथील क्रीडाशिक्षक अरविंद जाधव यांची तलाठी म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे युवा अध्यक्ष डॉ.रणजित पाटील यांनी केले.