नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केला. पण हा निकाल विरोधात गेल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आता सोमवारी २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
ठाकरेंच्या वकिलांनी सरन्यायाधिशांकडं विनंती केली आहे. लाईव्ह लॉच्या माहितीनुसार, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना शिवसेनेच्या वरिष्ठ वकिलांनी विनंती केली की, आपली सुनावणी शुक्रवार ऐवजी सोमवारी ठेवण्यात यावी. त्यामुळे आता ही सुनावणी सोमवार, २२ जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल नार्वेकरांकडं सर्व पुरावे सादर करुनही शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांवर घटनेतील १०व्या अनुसुचीनुसार अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, अशी तक्रार करत ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी या याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंतीही यामध्ये करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असून त्यांचा व्हिप भरत गोगावले हाच खरा व्हिप असल्याचे म्हटले.. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हिप सुनील प्रभूंचा व्हिप शिदेंच्या १६ आमदारांविरोधात लागू होत नाही. त्यामुळे ते अपात्र ठरत नाहीत. तसेच गगावलेंनी काढलेला व्हिप चुकीच्या पद्धतीनं आमदारांपर्यंत गेला त्यामुळे ठाकरे गटाचेही आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल नार्वेकरांनी दिला आहे.