महाराष्ट्रातील राजकारणातच सक्रीय राहणार

0
13

मुंबई : प्रतिनिधी
गेली तीन वर्षापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना गुरूवारी (१६ नोव्हेंबर ) देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला.आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसून महाराष्ट्रातील राजकारणातच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यांतील प्रचारात फडणवीस सहभागी होत असल्याने ते राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी पार पाडू लागल्याची चर्चा रंगली होती. फडणवीस आगामी काळात दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतील आणि उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढतील, असेही बोलले जाऊ लागले होते. मात्र, गुरूवारी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.
“राजकारणात १० दिवसांनी काय होईल, हे माहिती नसते पण, पुढील १० वर्षांनंतरही मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असेन आणि पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन,” असे फडणवीसांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
“राज्यातील राजकारणात खूपच कटुता आली आहे. निवडणुकांच्या काळात ती वाढतच जाते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर ती कमी होईल,” अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली.

वर्षा शेवटी सागरालाच मिळते
पुढील दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर साजरी करणार? यावरही फडणवीसांनी भाष्य केले आहे. “मी पुढील दिवाळी ‘सागर’ बंगल्यावरच साजरी करणार आहे. ‘वर्षा’ शेवटी सागरालाच मिळते,” अशी टीप्पणी फडणवीसांनी केली आहे.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपा कधीही तयार आहे. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका स्थगित आहेत. त्या भाजपामुळे थांबलेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जो निकाल लागला आहे, तोच या निवडणुकांमध्ये लागेल व भाजपाला घवघवीत यश मिळेल,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here