मालवाहू रिक्षाची प्रवासी रिक्षाला धडक : १२ वर्षीय बालिका ठार
जळगाव (प्रतिनिधी) –
यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी मालवाहू रिक्षा आणि प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. ट्युशनला जात असलेली सावदा येथील डॉक्टरांची १२ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे. इतर २ विद्यार्थ्यांसह एक प्रवासी जखमी झाले. फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अदिती सोपान खडसे (वय १२, रा. सावदा) असे मयत बालिकेचे नाव आहे. सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची ती कन्या आहे. अदितीच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे.
रविवारी प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्लू ३५९०) ही प्रवाशांना आणि ट्युशनला जाणाऱ्या डॉक्टरांच्या मुलांना घेऊन आमोदा येथून फैजपूरकडे येत होती. तेव्हा फैजपूरकडून आमोदाकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच १९-७०६४) ने प्रवासी रिक्षाला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदितीचा मृत्यू झाला आहे. डॉ शंतनु सरोदे यांच्या मुलाला खरचटले असून आणखी ओझल नामक मुलीला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे. मयत अदितीचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तपास फैजपूर पोलीस करीत आहेत. रुग्णालयात अनेक डॉक्टरांनी गर्दी केली. सावदा गावावर शोककळा पसरली आहे.