जळगावात सोने , चांदी स्वस्त
जळगाव (प्रतिनिधी)-
शहरातील सराफ बाजारात बुधवारी सोन्याचे दर उच्चांकी ९१ हजार ८७६ रुपये आणि चांदीचे दर एक लाख पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. या तुलनेत शुक्रवारी सोन्याचे दर तोळ्यामागे ५०० रुपयांनी कमी होऊन ९१ हजार ३६१ रुपये आणि चांदीचे दर किलोमागे तीन हजार रुपयांनी कमी होऊन एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत खाली आले.
गुरूवारी सोने दरात ३०० रुपयांनी तसेच चांदी दरात एक हजार रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी देखील सोने दरात गुरूवारच्या तुलनेत प्रति तोळा २०० रुपयांची आणि चांदी दरात प्रति किलो दोन हजार रुपयांची घसरण झाली. तरीही तीन टक्के जीएसटीसह सोन्याचे दर ९१ हजारावर आणि चांदीचे दर एक लाखावर टिकून असल्याचे दिसून आले.
बाजारात सकारात्मक किंवा नकारात्मक वातावरण तयार झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे वर्तन बदलते. अनेक गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी वळतात किंवा त्यापासून दूर राहतात. आर्थिक अस्थिरता, मंदी, महागाई वाढणे किंवा युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात आणि अधिक प्रमाणात सोने खरेदी करतात. त्यामुळेही सोन्याचे दर वाढतात.