मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणप्रश्नी शनिवार (दि. १६) राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान सरकारकडून जरांगे-पाटील यांना आरक्षप्रश्नासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षप्रश्नी सरकारला २४ डिसेंबर हा अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतर काल (दि. १५) १७ तारखेला सरकारने आपली भुमिका मांडावी असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान १७ तारखेला पुढील आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील सांगण्यात आले. शिष्टमंडळासोबत चर्चा करत असताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता सरकारने पाळलीच पाहिजे. तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे.
यावर मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आरक्षणाच्या विषयावर जरांगे पाटील यांनी जरा सबुरीने घ्यावे, २४ डिसेंबरच्या अल्टिमेटम बाबत विचार करावा, सरकार आरक्षणाच्या बाबतीत काम करत आहे. २४ म्हणजे २४ तारीख धरून बसू नये. थोडे मागेपुढे होईल पण सरकार मराठा समाजाला आरक्षण देईलच असा विश्वास महाजन यांनी जरांगे पाटील यांना दिला.
पुढे महाजन म्हणाले की, सरकार मराठा समाजाला १०० टक्के टिकणारे आरक्षण देईल. आरक्षणाबाबत काम वेगानं सुरु आहे. सरकारच्या कामावर जरांगे पाटील यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. मराठा समाजाला जे हक्काचे आहे ते मिळणारच आहे. सरकार मराठा आरक्षणाच्या बाबत वेगाने पुढं गेलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका सरकारची आहे. रात्र दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि गावांमध्ये नोंदी तपासण्याचे काम सुरु आहे. सरकारला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. गेल्यावेळीच्या त्रुटी निघाल्या त्या यावेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे गिरीश महाजन म्हणाले
आमच्याशी दगा फटका
झाला : मनोज जरांगे
आम्ही वारंवार सांगतोय निष्पाप लोकांना गुंतवण्यात आले आहे. माजलगावमधील बाहेर शिकायला असलेल्या पोरांना घेण्यासाठी घरी गेले आहेत. सरकार आम्हाला एकीकडे हा म्हणतंय आणि पोरांना उचलतंय, असे मनोज जरांगे म्हणाले. आमच्याशी दगा फटका झाला आहे. सगळ्यांनाच अटक होणार हे धरुन चाललो आहे. तुमच्यासमोर बोलायचं नाही तर कुणासमोर बोलायचं, गुन्हे मागं घेऊ म्हणले आणि माणसांना अटक केली आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
…तर आमदार बच्चू कडूही
आंदोलनात उतरणार
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठी नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपवण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. जरांगे-पाटलांनी १७ डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला इशारा दिला आहे. सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता केली नाही, तर आम्हाला आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असे बच्चू कडूंनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. बच्चू कडू म्हणाले, १७ डिसेंबरला जरांगे-पाटील नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत. जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांचा अहवाल सरकारने दिला नाही. सरकारने जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर आम्हाला जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल.१