जळगाव : प्रतिनिधी
माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे एवढा मी आर्थिक दुर्बल नाही, माझं डोकं ठिकाणावर नसतं तर गिरीश महाजन यांना उत्तर देण्याची वेळ आली नसती असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांनी लगावला आहे. गिरीश महाजन एका साध्या शिक्षकाचा मुलगा, आज हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊन बसला असा गंभीर आरोपही खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या दोघा दिग्गज नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप फैरी झडत आहेत.
राज्यात शेकडो लोक मरताहेत, त्याची जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या, नुसते एकनाथ खडसेवर टोलवा टोलवी करून चालणार नाही. नांदेडची जी मोठी दुर्घटना घडली ते खाते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्या घटनेला ते स्वतः जबाबदार असल्याचा आरोप मी केला होता. जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय सेवा ही कोलमडलेली आहे. सरकारने वेळेत लक्ष दिले नाही तर नांदेड सारखीच घटना जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही अशी भीती एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात डेंगूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असताना दुसरीकडे मात्र आपल्या जळगाव जिल्ह्यातले मंत्री हे विदेशात फिरत आहे, तिकडे मौज मजा करत आहे. जळगाव जिल्ह्यात यायला त्यांना वेळ कुठे आहे असे म्हणत जपान दौरा करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला.