जळगाव : प्रतिनिधी
आ. एकनाथराव खडसे यांचा आजार केवळ ढोंग असून त्यांना १३७ कोटींची नोटीस आल्यामुळे ते दवाखान्यात बसले आहेत, असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यावर आ. एकनाथराव खडसे यांनी काल रविवारी २६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय कागदपत्रे सादर करुन आजाराबाबत माहिती दिली तसेच, आजार खरा असतानाही तो खोटा असल्याबाबत सांगून समाजात बदनामी केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना आ. खडसे यांनी १ रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे.
तसेच, मी आव्हान दिल्याप्रमाणे तुम्हाला जोडे मारायला कधी येऊ? असा प्रश्नही मंत्री महाजन यांना केला आहे. तसेच, मंत्री महाजनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या घटकांचा अवमान केल्याचेही आ. खडसेंनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते आ. एकनाथराव खडसे नुकतेच हृदयविकाराच्या त्रासातून बरे होऊन बाहेर आले मात्र, त्यांचा आजार खोटा(सोंग)असल्याचे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यावर आ. खडसे यांनी रविवारी पत्रपरिषद घेतली.
मला हृदयविकाराचा झटका आला.त्यातून माझा पुनर्जन्म झाला.असे असताना मंत्री असूनही महाजनांनी बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. खडसे यांनी गिरीश महाजनांना, आजार खोटा असल्याचे सिद्ध करा व मला भरचौकात जोडे मारा असे आव्हान दिले होते मात्र, आता वैद्यकीय कागदपत्रे सादर करून आ. खडसे यांनी गिरीश महाजनांनाच जोडे मारण्याबाबत आव्हान दिले आहे.
तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना मी घडविले, जे मला बाबा म्हणून हाक मारायचे, त्यांनी बालिशपणाने हे कृत्य केले आहे.भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिशाभूल करून आंदोलनाला नेले असा आरोपही त्यांनी केला.
मंत्री महाजनांना पाठवली नोटीस
मंत्री महाजन हे वैद्यकीय तज्ज्ञ नसतानाही बेजबाबदार वक्तव्य करून आ. खडसे यांची बदनामी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचाही मान ठेवलेला नाही. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसात लेखी व प्रसार माध्यमांसमोर माफी मागावी. यापुढे आ. खडसे यांची बेअब्रू होईल, असे वक्तव्य करू नये याची लेखी हमी द्यावी अन्यथा फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करावा लागेल.तसेच अब्रुनुकसानीपोटी प्रतीकात्मक स्वरूपात १ रुपया नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करावा लागेल, अशा आशयाची नोटीस आ. खडसे यांनी ॲड. अतुल सूर्यवंशी व ॲड. हरूल देवरे यांच्यामार्फेत मंत्री महाजनांना पाठविली आहे.