गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिर
चोपडा (प्रतिनिधी)-
गांधी रिसर्च फाऊंडेशन (जळगाव) यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला उमर्टी (ता. चोपडा) येथील सौ. पा.रा. भादले आदिवासी आश्रमशाळा येथे सुरुवात झाली. शिबिराचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करून करण्यात आला.
शिबिराचे उद्दिष्ट ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा, नेतृत्वगुण, स्वावलंबन व सामाजिक भान विकसित व्हावे, त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हे आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन मिळत असून, श्रमसंस्कारांमुळे त्यांच्यामध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव निर्माण होतो.
उद्घाटनप्रसंगी शाळेचे संचालक नरेंद्र भादले, सामाजिक कार्यकर्ते अमोल बारेला व पो. पा प्रल्हाद बारेला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती दिली.
प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते अब्दुल भाई यांनी “युवकांची जबाबदारी काय?” या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. त्यांनी स्वॉट एक्सरसाइज (SWOT – Strengths, Weaknesses, Opportunities, Threats) द्वारे शिबिरार्थींना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त केले. व्यक्तिमत्व घडवताना मूल्ये, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि श्रमाचा सन्मान कसा आवश्यक आहे, हे समजावून सांगितले.
या कार्यक्रमात सुधीर पाटील सर यांनी श्रम संस्काराचे महत्त्व पटवून देताना म्हटले की, खऱ्या शिक्षणाचा पाया श्रमातच दडलेला असून, श्रमाच्या माध्यमातूनच जीवनातील मोठे धडे शिकता येतात.
सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चौधरी यांनी केले. यावेळी मयूर गिरासे, विक्रम अस्वार आणि परिसरातील रवंजे, खाऱ्यापाडा, गौऱ्यापाडा, वैजापूर , उमर्टि येथील 40 शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
या सात दिवसांच्या शिबिरात श्रमदान, बौद्धिक सत्रे, प्रात्यक्षिक कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, योग, समूहचर्चा व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.