खेडी शिवारात ४८ हेक्टर्समध्ये रस्ते व गटारीसाठी निधी मिळणार
जळगावः ( प्रतिनिधी )-
राज्य शासनाने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रारुप विकास योजना मंजूर केल्या. त्यात जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील खेडी शिवारात ४८ हेक्टर्समध्ये टी. पी. स्किम ४ व ५ ला मंजुरी मिळाली आहे. यामुळे स्वामीनारायण मंदिर परिसराचा विकास होणार आहे.
खेडी भागात शेती भूसंपादनाची गरज राहणार नाही. जागा मालकांना त्या ठिकाणी लेआउट टाकता येणार आहेत. ६५ टक्के जमीन शेतकऱ्यांची तर ३५ टक्के जमीन महापालिकेच्या मालकीची राहणार आहे. शाळा, क्रीडांगण, उद्यान, रस्ते, वीज, गटारी यासह विविध सुविधा टीपी स्कीम मध्ये आहेत. टीपी स्कीम मंजूर झाल्याने ४८ हेक्टर्सचा भाग ग्रीन झोनमधून येलो झोनमध्ये येणार आहे.
महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे रचना सहाय्यक अतुल पाटील व समीर बोरोले यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. नाशिक विभागीय कार्यालय व तेथून पुण्यातील नगररचना विभागात हा प्रस्ताव पाठविण्यात आला. तेथे मंजूरी मिळाल्यानंतर सहा महिन्यापासून मंत्रालयात प्रलंबित होता. या ठिकाणी सर्वात आधी रस्ते व गटारीसाठी निधी मंजूर होईल.



