सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन

0
77

सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय 80) यांचे आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास एका खासगी रूग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शहराच्या पूर्व भागातील विणकर पद्मशाली समाजातून आलेले धर्मण्णा सादूल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. 1989 सालची सार्वत्रिक आणि 1991 सालच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत सादूल हे काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर मतदारसंघातून निवडून आले होते. अलिकडे त्यांनी वृध्दापकाळात प्रकृती साथ देत नसतानाही काँग्रेस पक्षातून बाहेर पडत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला होता मात्र या पक्षातही ते सक्रिय नव्हते.
सादूल हे 1989 साली महापौर असताना त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना काँग्रेसने सोलापुरातून संधी दिली होती. त्यावेळी दिवंगत झुंजार संपादक रंगाआण्णा वैद्य यांनी तिसऱ्या आघाडीतर्फे आव्हान दिले असता त्यावर मात करून सादूल हे निवडून आले होते. त्यानंतर 1991 सालेल्या लोकसभा मध्यावधी निवडणुकीतही सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले होते मात्र पुढे 1996 सालच्या लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या तिरंगी लढतीत ते थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. खासदार असताना त्यांचा तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी संपर्क वाढला होता. तत्पूर्वी, सुरूवातीच्या काळात तत्कालीन सोलापूर जिल्हा सहकारी उद्योग बँकेत ते कर्मचारी होते, त्याच बंँकेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here