माजी नगरसेवकाची नऊ लाखांत फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) –
मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे आश्वासन देत जळगावचे माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची नऊ लाख 18 हजार 500 रुपयांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
नवनाथ दारकुंडे (55, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण सानप, संगीता सानप, समीक्षा सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश शुक्ला (रा. मुंबई) आणि दिवाकर राय (रा. दिल्ली) या पाच जणांनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने 9 लाख 18 हजार 500 रुपये स्वीकारले. त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दारकुंडे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. शहर पोलिस ठाण्यात या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.