प्रेमविवाहाच्या रागातून पित्याचा गोळीबार : मुलगी ठार, जावई जखमी
चोपडा (प्रतिनिधी )-
प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेली मुलगी व जावयावर गोळीबार केला असून त्याची मुलगी ठार झाली जावई गंभीर जखमी झाल्याने परिसर हादरला आहे.
प्रेम विवाहाच्या रागातून आपल्या नणंदेच्या हळदीच्या सोहळ्यासाठी आलेली मुलगी व तिचा पती यांच्यावर सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने गोळीबार केला.यात मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय २४ ) हिचा मृत्यू झाला असून तिचा पती अविनाश ईश्वर वाघ ( वय २८ ,दोघे रा करवंद, शिरपूर, ह . मु. कोथरूड पुणे) याला पाठीत व हाताला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शहरातील आंबेडकर नगर (खाईवाडा जवळ ) येथे शनिवारी रात्री 10 वाजेला घडली. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेम विवाह झाला होता. अविनाश याच्या बहिणीची हळद २६ एप्रिलरोजी चोपडा शहरातील खाई वाडा जवळील आंबेडकरनगर येथे होती. त्यानिमित्ताने ते चोपडा येथे आले होते. तृप्तीने प्रेमविवाह केला याचा राग वडील निवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण अर्जुन मंगले ( वय ४८,रा शिरपूर जि धुळे )यांच्या मनात होता. ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले.त्यांनी मुलगी तृप्ती वाघ व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेमुळे उपस्थित वऱ्हाडींना राग येऊन त्यांनी गोळीबार करणाऱ्या किरण मंगले याला पब्लिक मार दिला यात तो गंभीर जखमी झाला आहे.जावाई अविनाश व सासरा किरण मंगले यांना जळगावला रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.