शेतमजूराची झाडाला गळफासाने आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी) –
नंदगाव येथील शेतमजुराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्चरोजी दुपारी उघडकीस आली तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रतीलाल अंकुश भिल (४३, मूळ रा. मोहाडी, ह. मु. नंदगाव ता. जळगाव) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित व दोन अविवाहीत मुली आहेत. शेतमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते.आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
काही दिवसांपासून ते कामानिमित्त नंदगाव येथे राहत होते. शुक्रवारी त्यांनी घराच्या बाजूला एका शेडजवळील झाडाला गळफास घेतला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.



