विरोधकांकडे बोट दाखवत फडणवीसांचे कुणाल कामरावर कारवाईचे संकेत

0
19

 

विरोधकांकडे बोट दाखवत फडणवीसांचे कुणाल कामरावर कारवाईचे संकेत

मुंबई (प्रतिनिधी)-

कुणाल कामराचं गाणं समोर आल्यावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आक्षेपानंतर विधानसभेत याचे पडसाद उमटले. आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर निवेदन करताना विरोधकांकडे बोट दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामरावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून रविवारी संध्याकाळपासून चर्चा सुरू झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेला लक्ष्य करणारं विनोदी गाणं कुणाल कामराने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये गाऊन दाखवलं. त्याच्या या गाण्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.

कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्यांविरोधात व कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार अर्जुन खोतकर यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. “कुणाल कामरा हिंदू देवदेवतांचा अवमान करतो. त्याच्या मनात धार्मिक दोष आहे. त्यांच्या विधानामुळे राज्यात दंगली घडू शकतात. त्याच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाहीत, तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी प्रवृत्ती आत्ताच ठेचावी लागणार आहे. कुणाल कामराच्या अशा वागण्यामुळे दोन विमान कंपन्यानी त्याच्यावर प्रवासाची बंदी घातली होती. कॉमेडीच्या नावावर सुपाऱ्या घेऊन राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कामरा करतोय. कामराचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. कामरा भाड्याचा बाहुला आहे. खरा सूत्रधार आपल्याला शोधावा लागेल”, असंही खोतकर म्हणाले. त्यांनी कुणाल कामराचे फोन रेकॉर्ड तपासण्याचीही मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवेदन केलं. कुणीही अभिव्यक्ती करू नये असं आपलं म्हणणं नाही. हास्य, व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. राजकीय व्यंग झालं तरी आपण त्याला दुसरा कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण ते स्वैराचाराकडे जाणारं असेल, तर ते मान्य होणारं नाही देशातल्या उच्चपदस्थ लोकांच्या बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. अशा हव्यासातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करून खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. खरंतर या कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या निवडणुकीतून जनतेनंच हे ठरवून दिलं की कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का?” असंही फडणवीस म्हणाले.मला आश्चर्य वाटतं की राजकीय मतभेद असू शकतात, पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावर जाऊन कुणीतरी बोलतो आणि समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ बोलायला उभे राहतात. हे काय कामराशी ठरवून चाललंय की कामराला तुम्ही सुपारी दिली आहे? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे”, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

त्यांनी माझ्यावर, शिंदेंवर कविता करावी, राजकीय व्यंग करावं. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण सुपारी घेऊन कुणी अपमानित करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे म्हणत छात्या बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतो, या गोष्टी महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही”, असंही फडणवीस म्हणाले.

अशा प्रकारचे अर्बन नक्षल, लेफ्ट लिबरल एकच आहेत. त्यांचा उद्देश एकच आहे. समाजातल्या मानकांना, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, असं काम करणाऱ्या लोकांना सोडता कामा नये. त्यामुळे कठोर कारवाई केली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here