पक्ष आणि चिन्हापेक्षा अख्खा महाराष्ट्र पवारसाहेबांसोबत

0
32

जळगाव : प्रतिनिधी

चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे पवार साहेब आहेत. तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवार साहेबांसोबत राहून लढणार आहे. स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही असे टीकास्त्र आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याला आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जळगावातील खेडी येथील आयोजित मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितले नव्हते तर शरद पवार साहेबांकडे बघितले होतं. आम्ही म्हणत होतो, भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आहे. दोन महिने होताच, त्यांचा अहंकार जागा झाला झाला आहे. भाजपचे नेते सांगतात.. निवडणूक आयोग आपलंच ऐकते. त्यातुनच हा अहंकार प्रफुल्ल पटेल यांच्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच हे निर्णय देतात, यावरूनच समजून घ्या की निवडणूक आयोग कोणाचं ऐकतेय, असा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
चिन्ह आम्हालाच मिळेल त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल. आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे.. निकाल आमच्याच बाजूने लागेल असे वक्तव्य अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. याच विषयावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना जोरदार उत्तर दिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावमध्ये सभा होणार आहे. त्या सभेच्या तयारीसाठी रोहित पवार जळगावसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. जळगावमधील सभा यशस्वी ठरावी म्हणून रोहित पवार प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here