नागपूर : वृत्तसंस्था
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून राजकारण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सलीम कुत्तावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचे हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसेंनी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना प्रत्युत्तर देतांना माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
आ. खडसे काय म्हणाले?
“१९९३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नसमारंभात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांसह राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक हजर होते तसेच गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. सुधाकर बडगुजरांवर तातडीने कारवाई करण्यात आली तसेच, मंत्र्यांनी मंत्रिमंडळात राहणे कितीपत योग्य आहे? म्हणून सरकारने तातडीने चौकशी करावी,” अशी मागणी एकनाथराव खडसेंनी विधानपरिषदेत छायाचित्र दाखवत केली होती.
दाऊदशी कुठलाही संबंध नाही
यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाशिकमधील मुस्लीम धर्माचे धर्मगुरू ज्यांना ‘शेहरेखातीब’ म्हणतात, त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला गिरीश महाजनांसह अन्य पक्षांतील नेते आणि अधिकारी उपस्थित होते. शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले त्यांच्या कुटुंबाचाही दाऊदशी कुठलाही संबंध नाही.”
“दाऊदशी संबंध असल्याचा गुन्हा शेहरेखतीब यांच्यावर नाही तथापी, तेव्हा आरोप झाल्यानंतर तत्कालीन डीसीपीच्या आधारे मी चौकशी समिती नेमली होती. चौकशीनंतर डीसीपीचा अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले की, ‘शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही’,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.खडसे यांनी केलेले आरोप फेटाळले असले तरी शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी आपणही या पार्टीत होतो आणि गिरीष महाजन हेदेखील या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते,असा दावा केला आहे.त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
बेछुट आरोप-माफी मागावी
“उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आल्याने अशाप्रकारचे विषय आज आले असतील. पण, खातरजमा न करता एका मंत्र्यावर आरोप करण्यात आले. अशा प्रकारची तडफड बडगुजर सलीम कुत्ताबरोबर नाचताना का दाखवली नाही? मंत्र्यावर बेछूट आरोप केल्यावर एकनाथ खडसेंनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
