मुंबई : प्रतिनिधी
मुंबई – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केली आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली. ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. तर, ससून रुग्णालय प्रशासनालाही धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या ललितला अखेर पोलिसांनी तमिळनाडूतील चेन्नई येथून अटक केली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
ज्यांचा सहभाग आहे,
त्या सर्वांची नावे उघड होणार
अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) तस्करीचा गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर कोर्टात हजर केलं जात असताना ललित पाटीलने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यात त्याने मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावे सांगणार आहे, असे वक्तव्य केलं. याबाबत विचारलं असता मुंबई पोलिस म्हणाले की, ललित पाटीलला न्याया१लयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भारतीय दंड विधान कलम २२४ नुसार ललित पाटीलवर एक स्वतंत्र गुन्हा पुण्यात दाखल आहे. पुणे पोलीस त्यांच्या दृष्टीने काम करत आहे.
सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच अटक
ड्रग्जचं उत्पादन आणि त्यांचा पुरवठा यात दोघांचाच सहभाग होता. तो सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही पाठपुरावा करून अटक केली. आतापर्यंत याप्रकरणी आम्ही १४ जणांना अटक केली आहे. सकाळी ललित पाटीलला अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
नाशिकमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता, त्यानंतर सोलापूरातील एमआयडीसीमध्येही ड्रग्जचा साठा सापडला. महाराष्ट्रात अशा प्रकारे ड्रग्जचे साठे सापडणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. या ड्रग प्रकरणातील ललीत पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात सर्व सोयींचा उपभोग घेत होता हे समोर आले आहे. या ललित पाटीलला पळवून लावण्यात आल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. आज आमचे म्हणणे खरे ठरले असून ललीत पाटील स्वतःच सांगत आहे की त्याला पळवून लावण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. ड्रग्जच्या काळ्या धंद्याला कोणाचा आशिर्वाद आहे ? ललीत पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे? हे उघड झाले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
राजकीय आशीर्वाद शिवाय ड्रग्जचा
धंदा शक्य नाही : पटोलेंचा आरोप
महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.