एकमेकांच्या नावानं चेपू नका बोटं जळगावचं नाव मोठं… लक्षण खोटं

0
30
एकमेकांच्या-नावानं-चेपू-नका-बोटं-जळगावचं-नाव-मोठं.-लक्षण-खोटं-saimatlive.com

लोकप्रतिनिधींमधील वादाचं जनतेला काहीही देणंघेणं नाही.त्यांना केवळ शहरातील रस्ते चकचकीत झाले पाहिजे,प्रभागात गटारी व पथदिव्यांची व्यवस्था झाली पाहिजे,आरोग्याच्यादृष्टीने साफसफाई नियमीत झाली पाहिजे,एवढ्याच माफक अपेक्षा आहेत.या अपेक्षा तर हल्ली ग्रामपंचायतही पूर्ण करते.जळगावला तर महानगरपालिका आहे.त्या अपेक्षापूर्तिसाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरुन एकत्रितपणे कामाला जुंपले पाहिजे असे जनतेला वाटते.त्यासाठी जळगावकरांचे एकच म्हणणं आहे की , एकमेकांच्या नावानंं चेपू नका बोटं… जळगावचं नाव मोठं,लक्षण खोटं…
नाव मोठं लक्षण खोटं हा मराठी चित्रपट सत्तरच्या दशकात गाजला.त्यात अरुण सरनाईक व उषा चव्हाण हे प्रमुख भूमिकेत होते.त्यावेळी जळगाव शहर हे राज्यातील एक विकसनशिल शहर समजले जाऊ लागले होते.

जळगावची खरी ओळख झाली ती ऐंशीच्या दशकात.त्यामागील कारणं वेगवेगळी असू शकतील पण जळगावला कोणी ओळखत नाही,असा व्यक्ती महाराष्ट्रात तरी कोणी सापडणार नाही.सर्वात प्रथम जळगाव ओळखलं जात होतं ते कवयित्री बहिणाबाईच्या नावानं.त्यानंतर लोकप्रिय झालं ते मेहरुणची बोरं म्हणून.त्यानंतर जळगावची ओळख झाली ती केळीचंं आगार म्हणून.काळाच्या ओघात नंतर जळगाव ही ‘सुवर्णनगरी’ म्हणून परिचीत झाली.आता अलीकडे जळगावच्या नावापुढं ‘वस्त्रनगरी’ असं ब्रीदही लावले जाऊ लागले आहे.नव्वदच्या दशकात तर जळगाव हे राज्यातील एक विकसनशील शहर होतं.सुरेशदादांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमार्फत शहरात झालेली विकास कामे बघण्यासाठी केवळ राज्यातून नव्हे तर परप्रांतातून पथके जळगावात येत असत.विकासाचा जळगाव पॅटर्न त्याकाळी लोकप्रिय झाला होता.सुरेशदादांपाठोपाठ त्यात प्रदीपभाऊ रायसोनी यांचाही मौलीक वाटा होता हे मान्य करावे लागेल.

त्याच गतीने जर जळगाव शहर विकासाची घोडदौड सुरु राहिली असती तर आज जळगाव राज्यातील विकसीत प्रमुख शहरांपैकी एक राहिलं असतं मात्र त्यानंतर जळगावच्या या विकासाला कोणाची नजर लागली राम जाने.शहराचा विकास तर खुंटलाच पण जे काही होतं ते देखील राहिलं नाही.आता जळगावचं पथक इंदौरच्या विकासाचा पटर्न बघण्यासाठी इंदौरला जाणार असल्याचं वृत्त आहे.काय म्हणावं याला,आहे की नाही काळाचा उलटा महिमा.

विकास तर बाजूला राहिला,शहरातील रस्त्याची दुरवस्था इतकी झाली की,लोकांना पायी चालणेही अवघड झाले.हाच अवघड जागी दुखण्याचा मुद्दा हाती पकडून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मोठमोठे होल्डींग शहरातील मुख्य चौकाचौकात लावून जळगाव खड्ड्यात गेले आहे.या खड्ड्यातून जळगावला बाहेर काढण्याची ग्वाही देत राजूमामा भोळे हे भाजपाच्या बॅनरखाली मैदानात उतरले.त्यावेळी देशात नरेंद्र मोदी यांची लाट आली होती.त्याचा लाभ घेत, नागरिकांनीही आश्वासनांवर विश्वास टाकत त्यांना निवडून दिले मात्र पहिल्या टर्ममध्ये ते रस्त्यांचे आश्वासन पूर्ण करु शकले नाही,हे तेवढेच सत्य कोणी नाकारु शकत नाही.त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्येही लोकांनी त्यांनाच निवडून दिले कारण केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने जळगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी मिळेल असे मतदारांना वाटले असावे.त्यापाठोपाठ मनपा निवडणुका लागल्या.

२०१९ मध्ये तत्कालीन मंत्री गिरीष महाजन यांनी एक वर्षात जळगावचा चेहरा-मोहरा बदलवू अशी ग्वाही दिली.जाहिरनाम्यातही हे वचन देण्यात आले त्यामुळे मतदारांनी ७५ पैकी ५७ जागा देऊन भाजपाला मनपाची एकहाती सत्ता दिली.एक वर्षात तर सोडा,तीन वर्षातही काही झाले नाही.जळगावचा चेहरामोहरा बदलणे तर सोडाच,शहराचा चेहरा आणखी विद्रुप झाला.रस्त्यात काही ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले.शहरात रस्त्यात खड्डे की,ख़ड्ड्यात रस्ते असे चित्र दिसू लागले.अपघातांचे प्रमाण वाढले.कोणाचे हात-पाय तुटू लागले तर कोणाचा पाठीचा कणा मोडला तर कोणाची कंबर तुटली.त्यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला मात्र याचं लोकप्रतिनिधींसह राज्य शासनालाही काही सोयरसुतक होतं असं वाटलं नाही.रस्त्यांसह विकासासाठी कोटीने निधीच्या घोषणा होत होत्या मात्र प्रत्यक्षात निधी येत नव्हता.मनपा कर्जबाजारी असल्याने ती रस्ते करण्यास हतबल होती.त्यात अमृत योजनेच्या नावाखाली पध्दतीशिरपणे वेळ मारुन नेण्यात येत होती.

गेल्या दिड-दोन वर्षापासून हळूहळू निधी येऊ लागला.अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे राज्य आले अन्‌‍‍ त्याचवेळी योगायोगाने जळगाव मनपावरही शिवसेनाचा भगवा फडकला.जयश्रीताई महाजन महापौर झाल्या. विकास कामांना वेग येईल असे जळगावकरांना वाटू लागले. निधी काही प्रमाणात येण्यास सुरुवात झाली अन्‌‍‍ पुन्हा राज्यात राजकीय उलथापालथ होऊन मविआचं सरकार जाऊन भाजपा-शिवसेना (शिंदे गट)युतीचं सरकार आलं.

योगायोगानं जिल्ह्यातील पाचही शिवसेना आमदार शिंदे गटात गेल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच राहिले मात्र त्यांची भूमिका बदलली.विकासनिधी वाटपातही राजकारण आले व निधीला अडथळा निर्माण झाला.राजूमामा भोळे हे भाजपाचे आमदार असल्याने त्यांनी विकास निधी आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली कारण त्यांनाही गेल्या सहा वर्षाचा बॅकलॉग भरुन काढायचा होता.दरम्यान त्यांनी शहरातील विविध भागात आपल्या निधीतून विकासकामांना चालना देण्याचा खटाटोप सुरुच ठेवला.आता महापौर जयश्रीताई महाजन व आ.राजूमामा भोळे यांच्यात श्रेयवादावरुन जुंपल्याचे चित्र दिसत आहे.

दोघांनीही विकासकामांसाठी निधी आणल्याचा दावा सुरु केला.रस्त्यांच्या कामांना आपणच चालना दिली,असा दावाही दोघांकडून होऊ लागला आहे.एकमात्र खरं की,दोघांच्या भांडणात नागरिकांची करमणूक होऊ लागली.कोणी काय केलं हे जनतेला माहित आहे.कोणी कामं केली,कोणी फक्त वल्गना केल्या हे जनता जाणून आहे व त्याचे मोजमाप ते येत्या निवडणुकीत करतील यात संदेह नाही.
आम्ही काय केलंय हे जळगावकरांना माहित आहे,असा दावा माजी महापौर जयश्रीताई महाजन ह्या करीत आहेत तर रस्त्यासाठी पुरेसा निधी कोणी आणला,हे जनतेला समजतं,असा दावा आ.राजूमामा भोळे हे करीत आहे.त्यांनीही आमदार निधीतून प्रभागनिहाय विकास कामांना चालना दिली आहे,हे नाकारुन चालणार नाही.प्रभागातील खुल्या जागा विकसीत करणे, प्रभागात मुख्य चौकात मिनी हायमास्ट लाईट उभारणे, बेंचेस देणे ही कामे मार्गी लावली आहेत.विरोधक तर विरोध करणारच.

मी त्याच्याकडे लक्ष न देता,माझे काम सुरुच ठेवणार,अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.सत्तेवरुन जाता जाता जयश्रीताई महाजन यांनीही काही चांगली कामे केली व काही जनहिताचे ठरावही संमत करुन घेतले हे नक्की.पिंप्राळ्यातील शिवस्मारक उभारण्यात उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा सिंहाचा वाटा असला तरी त्यात जयश्रीताई महाजन यांचाही मोलाचा वाटा आहे.

मनपाच्या प्रांगणात अडथळ्यांच्या शर्यतीवर मात करत सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारुन त्याचे अनावरण करणे हेसुध्दा धाडसाचे काम आहे.महिलांसाठी शहरात स्वच्छतागृहे उभारणे,मनपात मातांसाठी हिरकणी कक्ष सुरु करणे,ही कामेही दखल घेण्याजोगी आहे.शहरातील ३०० स्केअर फूट मालमत्ताधारकांना करमुक्त करण्याचा ठराव एकमताने संमत झाला असतांना,त्यास भाजपाच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला असतांना तो ठराव विखंडीत करण्यासाठी आयुक्तांमार्फत पाठवला जातो व त्यावर स्थानिक आमदार चुप्पी साधतात,याला काय म्हणावं.गेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपाने करमाफीचे आश्वासन दिले होते.त्याचा विसर तर भाजपाला पडत नाही ना? लोकप्रतिनिधींमधील वादाचं जनतेला काहीही देणंघेणं नाही.

त्यांना केवळ शहरातील रस्ते चकचकीत झाले पाहिजे,प्रभागात गटारी व पथदिव्यांची व्यवस्था झाली पाहिजे,आरोग्याच्यादृष्टीने साफसफाई नियमीत झाली पाहिजे,एवढ्याच माफक अपेक्षा आहेत.या अपेक्षा तर हल्ली ग्रामपंचायतही पूर्ण करते.जळगावला तर महानगरपालिका आहे.त्या अपेक्षापूर्तिसाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरुन एकत्रितपणे कामाला जुंपले पाहिजे असे जनतेला वाटते.त्यासाठी जळगावकरांचे एकच म्हणणं आहे की,एकमेकांच्या नावानंं चेपू नका बोटं… जळगावचं नाव मोठं,लक्षण खोटं…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here