तुळजाभवानीच्या तिजोरीत ८० कोटींचे दान, यंदाचे व्याज २३ कोटी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी )-
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात मागील वर्षभरात ८० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. देशभरातील भाविकांनी अर्पण केलेले दागिने आणि मौल्यवान धातूंची संख्याही लक्षवेधी आहे. तुळजाभवानी देवीच्या चरणी १७ किलो सोने आणि २५६ किलो चांदी अर्पण करण्यात आली. तुळजाभवानी मंदीर समितीच्या पाच बँकांमध्ये २७४ कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यावर यंदा २३ कोटी ८१ लाख रुपये व्याजही मिळाले.
दोन दशकांपासून तुळजाभवानी मंदिर संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वीस वर्षांत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे. दळणवळणाच्या सुविधा आणि मंदिर परिसरात उपलब्ध सोयींमुळेही देशभरातील भाविकांची संख्या संपूर्ण वर्षभर वाढत आहे.
विविध मार्गाने मंदिराच्या उत्पन्नात ८० कोटी ८१ हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली. मागील वर्षी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात ६६ कोटी रुपये जमा झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १४ कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर समितीच्या तिजोरीत जमा झालेली रोकड ५४ कोटी २३ लाख रुपये एवढी होती. दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल २६ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी २० किलो सोने आणि ३५९ किलो चांदी अर्पण केली होती. त्यात यंदा घट झाली आहे. २०२३-२३ या आर्थिक वर्षात १६ किलो सोने २७० किलो चांदी अर्पण करण्यात आली. यंदा तुळजाभवानी मंदिरात सोन्यात एक किलोची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत १४ किलो चांदी कमी मिळाली आहे.